Home Nagpur Nagpur । सर्वांगीण विकासासाठी खेळ आवश्यक : नितीन गडकरी

Nagpur । सर्वांगीण विकासासाठी खेळ आवश्यक : नितीन गडकरी

615

क्रीडा मैदानाच्या लोकार्पणासह विविध चौक व मार्गांचे नामकरण

नागपूर ब्युरो : शहरातील मुलांना खेळता यावे यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनेक मैदाने विकसित केली. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच खेळ सुद्धा आवश्यक आहे. खेळातून युवांना शारीरिक, मानसिक, भावनिक विकासासोबतच आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होते. मध्य नागपुरातील दाटीवाटीच्या क्षेत्रात मुलांना खेळता यावे यासाठी येथे क्रीडा मैदानाची निर्मिती करण्यात आली. येथील मुलं सुद्धा क्रीडा क्षेत्रात पुढे जाऊन शहराचे नाव लौकिक करतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक १९, हंसापुरी खदान येथील खेळाच्या मैदानाचे लोकार्पण शुक्रवारी (ता. २५) गोपाळराव मोटघरे मनपा प्राथमिक शाळेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फुटबॉलला किक मारून केले. सोबतच विविध चौक आणि मार्गांचे नामकरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, विकास कुंभारे, नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेविका सरला नायक, बसपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार, सामाजिक कार्यकर्ते किशोर पालांदूरकर, अशोक नायक आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, मध्य नागपुरात आतापर्यंत मुलांना खेळण्यासाठी एकही मैदान नव्हते. मात्र वस्तीतील मुलं सुद्धा खेळली पाहिजे. या उद्देशाने मनपातर्फे या ठिकाणी क्रीडा मैदानाची निर्मिती करण्यात आली. यासोबतच शहरातील १३१ मैदानाचा विकास करण्यात आला. यासाठी त्यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांचे अभिनंदन केले. महापौरांनी शहराचा चौफेर विकास केला आहे. शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यात आली असून शहरातील ७० टक्के नागरिकांना २४ तास पाणी दिले जात आहे. गरीब घरच्या मुलांना सुद्धा इंग्रजी शिक्षण घेता यावे यासाठी मनपातर्फे ६ इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या, नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मनपा यशस्वी झाली असल्याचे प्रतिपादन यावेळी नितीन गडकरी यांनी केले. तसेच कोविड काळात महापौरांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याचे कौतुकही केले.

याप्रसंगी नितीन गडकरी यांनी रस्त्यांना नाव दिलेल्या महान व्यक्तींना अभिवादन केले. तसेच खेळाडूंचे सुद्धा अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी क्रीडा मैदानाच्या लोकार्पणासोबतच नालसाहेब चौक ते धोंडोबा चौक या मार्गाचे ‘महादेवराव प्रजापती मार्ग’, धोंडोबा चौक ते सेवासदन चौक या मार्गाचे ‘मेवालाल बाथो मार्ग’, खान मस्जिद, गीतांजली चौक येथील निलगिरी अपार्टमेंट समोरील टी-पॉईंटचे समाजसेवी ‘नामदेव मोगरकर टी-पॉईंट’, गीतांजली चौक येथील गुडलक ट्रॅव्हल्स समोरील टी-पॉईंटचे ‘माणिकराव मोटघरे त्रिवेणी पथ’, सेवासदन चौक येथील स्टार रेसिडेन्सी हॉटेल समोरील चौकाचे समाजसेवी ‘मनिराम प्रजापती चौक’ आदी चौक व मार्गांचे नामकरण करण्यात आले.

बजेरिया परिसर दाटीवाटीचा क्षेत्र असल्यामुळे या परिसरात विकास कामे करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र नागरिकांचे सहकार्य आणि सहयोग मिळाल्याने हे सर्व विकास कामे होऊ शकली, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले.

पुढे ते म्हणाले, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली मनपाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेतला. आज मध्य नागपुरातील जुनी सिवर लाईन, चेंबर बदलविण्यात आले, वस्तीतून पावसाचे पाणी निघण्याची व्यवस्था करण्यात आली. परिसरातील दूषित पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यात आले. नळाच्या पाण्याचा प्रवाह वाढविण्यात आला. पार्किंगची समस्या सोडविण्यात आली. या सर्व कार्याचे महापौरांनी नागरिकांना दिले. तसेच रस्त्याला नाव दिलेल्या सर्व व्यक्तींचा जीवन परिचय यावेळी त्यांनी करून दिला. सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी आमदार विकास कुंभारे आणि प्रवीण दटके यांनी आपले मत व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच नितीन गडकरी यांचे आभार मानले. तसेच ज्येष्ठ नगरसेवक ऍड संजय बालपांडे यांनी यावेळी प्रभागातील विकासाबाबत माहिती दिली. मध्य नागपुरातील मुलांना खेळण्याची संधी मिळावी यासाठी या परिसरात खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, अशी विनंती सुद्धा यावेळी त्यांनी नितीन गडकरींना केली. कार्यक्रमाचे संचालन रमाकांत गुप्ता यांनी तर आभार विशाल गौर यांनी केले.

Previous articleऑरेंज सिटी मॉल | नागपूरकरांचे नाव जागतिक स्तरावर नेणारा अभिनव प्रकल्प : ना. नितीन गडकरी
Next articleयुक्रेनमध्ये अडकलेल्या सहा विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांचा प्रशासनाशी संपर्क, सर्व जण सुखरुप असल्याची माहिती
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).