Home मराठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद । बाबासाहेबांच्या स्मरणासाठी 7 नोव्हेंबर राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद । बाबासाहेबांच्या स्मरणासाठी 7 नोव्हेंबर राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा

393

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी ७ नोव्हेंबर हा राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा, अशी सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी केली. मंडणगड तालुक्यातील डॉ. आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे राष्ट्रपती कोविंद यांनी सपत्नीक भेट देऊन आदरांजली अर्पण केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय भटके विमुक्त जाती‘जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू ऊर्फ दादा इदाते हे व्यासपीठावर उपस्थित होते.

कोविंद म्हणाले, ६ डिसेंबर हा डॉ. आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जात आहे. १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांची जयंती सर्वत्र साजरी होते. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. कारण याच दिवशी १९०० मध्ये बाबासाहेबांनी शाळेमध्ये प्रवेश घेऊन शिक्षणास सुरुवात केली होती. राष्ट्रीय पातळीवरील डॉ.आंबेडकरांच्या शिक्षणविषयक ओढ आणि निष्ठेचे स्मरण करून देण्यासाठी हा दिवस साजरा करणे आवश्यक आहे. येथे बसलेल्या संसदेतील सदस्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, मी त्यांना माझ्या परीने मदत करेन, असेही ते म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर मोठा व्यासंग केला. आजच्या पिढीतही ही प्रवृत्ती निर्माण व्हावी म्हणून या ठिकाणी उत्तमोत्तम पुस्तके असलेले ग्रंथालय निर्माण करण्याची सूचना राष्ट्रपती कोविंद यांनी केली आहे. त्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सहकार्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. या उपक्रमामध्ये मीही सहभागी होऊ इच्छ‍ितो. त्या दृष्टीने राज्यपालांनी राज्यपाल विवेकानुदान निधीतून ३० लाख रुपये देण्याची घोषणा केली.

Previous articleसुरक्षाव्यवस्थेत वाढ । शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
Next articleबजाज समूहाचे 50 वर्षे अध्यक्ष; 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).