Home मराठी लता मंगेशकर । पार्थिव प्रभूकुंजवर दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सचिन तेंडुलकर सह...

लता मंगेशकर । पार्थिव प्रभूकुंजवर दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सचिन तेंडुलकर सह अनेक मान्यवर अंत्यदर्शनासाठी दाखल

381

चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी गानकोकिळेने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. त्यांचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून प्रभूकुंज या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. येथे काही काळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. दीदींच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील प्रभूकुंजवर हजर आहेत. सचिन तेंडुलकर, आशा पारेख, सुरेश वाडकर, जावेद अख्तर, अनुपम खेर यांसह अनेक मान्यवर दीदींच्या अंत्यदर्शनासाठी प्रभूकुंज येथे उपस्थित आहेत. दीदींचे निवासस्थान असलेला पेडर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.


सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केलेल्या शोक भावना

आज सकाळपासून लता दीदी उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. सकाळी 8.12 वाजता अवयव निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मागील 8 जानेवारीपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, शिवाय न्यूमोनियाचेही त्यांना निदान झाले होते. त्यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

संध्याकाळी साडे सहा वाजता शासकीय इतमामात शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4.30 वाजता ते मुंबईत दाखल होणार आहेत.

त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यंदर्शन घेतले आहे.

दीदींचा अल्पपरिचय

लता मंगशेकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 ला एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मध्यप्रदेशच्या इंदोर शहरात जन्मलेल्या लता पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या थोरल्या कन्या होत्या. त्यांचे वडील रंगमंचाचे कलाकार आणि गायक होते. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी लता दीदींनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली होती. 1942 मध्ये लता दीदी अवघ्या 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

लता मंगेशकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले. त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत. 1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला. बॉलिवूडसह देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना आपल्या मोहक आवाजाने त्यांनी स्वरबद्ध केले. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942 मध्ये झाली. त्यांनी हजारांहून अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत. 2001 साली त्यांना ‘भारतरत्‍न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लता मंगेशकर अर्थात लतादिदींनी आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर ‘गानकोकिळा’ अशी बिरुदावली आपल्या नावासमोर मिळवली होती. गायनाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना भारत रत्नसह पद्म विभूषण, पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके अवार्ड सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

Previous articleलता मंगेशकर । एका सुरेल युगाचा अंत – डॉ. नितीन राऊत
Next articleलता मंगेशकर | कधीही शाळेत गेल्या नव्हत्या लता दीदी, खरे आडनाव आहे हर्डीकर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).