Home Maharashtra Election News । राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, नेत्यांना...

Election News । राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, नेत्यांना विजयाचा विश्वास

681

मुंबई ब्युरो : काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून आज रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे भाजपकडून संजय उपाध्याय यांच्या कडून राज्यसभेसाठी आज नामांकन अर्ज दाखल करण्यात आला आहे.

रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर ही निवडणूक महाविकास आघाडी जिंकेल असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. तर एखाद्या सदस्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विरोधकांकडून उमेदवार दिला जात नाही. ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही भाजपला विनंती करणार असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.

काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद होणार?

दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला आहे. रजनी पाटील यांच्यावर काही ऑब्जेक्शन आहेत. छाननी करताना त्या बाहेर पडतील, असा दावा पाटील यांनी केला. मात्र, काय ऑब्जेक्शन आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. मी कशाला सांगू. उद्यासाठी काही हवं की नाही, अशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

सातव यांच्या पत्नीला तिकीट का नाही दिलं?

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने उमेदवार देऊ नये, असं काँग्रेसने अप्रत्यक्ष म्हटलं होतं. त्यासाठी राज्याची परंपराही काँग्रेसने सांगितली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची परंपरा वगैरे तुम्हाला आठवत असेल तर सातव यांच्या पत्नीला तिकीट का दिलं नाही? राजीव सातव हे प्रविण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, संजय उपाध्याय, देवेंद्र फडणवीसांचे परम मित्रं होते. त्यामुळे सातव यांच्या पत्नीला तिकीट मिळेल अशी आमची अपेक्षा होती. पण तुम्ही रजनी पाटलांना तिकीट दिलं, असं ते म्हणाले.

कोण आहेत रजनी पाटील?

रजनी पाटील ह्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. आता जम्मू आणि काश्मीरच्या त्या काँग्रेस प्रभारी आहेत. ठाकरे सरकारनं ज्या 12 नेत्यांची नाव विधान परिषदेवर घेण्यासाठी राज्यपालांकडे पाठवलेली आहेत. त्यात काँग्रेसनं रजनी पाटील यांचंही नाव दिलेलं आहे. 1996 साली त्या बीडमधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. राजकारणाची सुरुवात त्यांनी जिल्हा परिषदेतून केलेली आहे.