आमदार संदीप जोशी यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर
नागपूर | विशेष प्रतिनिधी
“कुर्सी नाही, किंमत वाचवण्यासाठी थांबलो आहे” या त्यांच्या शेरमधूनच आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेण्याचा आपला निर्णय जाहीर केला. राजकारणातील वाढता संधीसाधूपणा, पक्षांतर आणि अस्वस्थ करणारी स्पर्धा पाहता स्वतः थांबणे हाच प्रामाणिक मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
55 व्या वर्षी आयुष्याच्या या टप्प्यावर तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी स्वतःची जागा रिक्त करणे आवश्यक असल्याचे मत जोशी यांनी मांडले. आपण आजही भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता असल्याचे सांगत, पक्ष आणि नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
त्यांची विधान परिषदेची आमदारकी 13 मे रोजी संपुष्टात येत असून, तोपर्यंतची सर्व घटनात्मक आणि सार्वजनिक कर्तव्ये पूर्ण जबाबदारीने पार पाडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र 13 मे नंतर कोणतेही पद स्वीकारणार नाही, तसेच पुन्हा आमदारकीची मागणीही करणार नसल्याचा ठाम निर्णय त्यांनी जाहीर केला.
या निर्णयाबाबत त्यांनी केंद्रीय नेतृत्वातील नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नम्र माफी मागत, हा निर्णय भावनिक नसून सखोल विचारांती घेतल्याचे स्पष्ट केले.
राजकारणातून निवृत्त होत असले तरी सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्य सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. ‘सोबत पालकत्व प्रकल्प’, ‘दीनदयाल थाळी प्रकल्प’, गोसेवा उपक्रम, तसेच विविध क्रीडा संघटनांमधील जबाबदाऱ्या पुढेही ते प्रामाणिकपणे पार पाडणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेले संस्कार, पक्षाने दिलेल्या संधी आणि सामान्य कार्यकर्त्याला चार वेळा नगरसेवक, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सदस्य होण्याचा सन्मान दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले.
आपल्या पत्राच्या शेवटी त्यांनी लिहिलेला शेरच त्यांच्या निर्णयाचे सार सांगतो—
“कुर्सी नहीं, क़ीमत बचाने चला हूँ,
शोर नहीं, सुकून चुनने चला हूँ।
किसी और की राह रोशन हो सके,
इसलिए ख़ुद एक क़दम पीछे हटा हूँ।”
राजकारणात संधी मिळू शकत असतानाही स्वतः थांबण्याचा घेतलेला हा निर्णय, सध्याच्या राजकीय वातावरणात दुर्मिळ आणि चर्चेचा ठरत आहे.




















