Home Devendra Fadanvis #Gadchiroli | गडचिरोलीची ‘स्टील हब’च्या दिशेने वाटचाल : मुख्यमंत्री फडणवीस

#Gadchiroli | गडचिरोलीची ‘स्टील हब’च्या दिशेने वाटचाल : मुख्यमंत्री फडणवीस

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब ऑफ इंडिया’ बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत असून, विकास प्रक्रियेला गती मिळत आहे. जिल्ह्यात लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनसरी येथे पार पडले.

यावेळी हेडरी येथील ५ दशलक्ष टन क्षमतेच्या आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांट, ८५ कि.मी. लांबीची स्लरी पाइपलाइन आणि ४ दशलक्ष टन क्षमतेचा पेलेट प्रकल्पाचे उद्घाटन झाले. तसेच एकात्मिक स्टील प्रकल्प, १०० खाटांचे रुग्णालय, सीबीएसई शाळा व कर्मचारी वसाहतीच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले, “गडचिरोलीचा चेहरामोहरा बदलत असून, स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. पर्यावरणाचा समतोल राखत विकास साधण्यावर भर दिला जात आहे.” स्लरी पाइपलाइनमुळे ५५% कार्बन उत्सर्जनात घट होणार असून, येत्या दोन वर्षांत १ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्टही जाहीर करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी माओवादी विचारसरणीपासून सावध राहण्याचे आवाहन करत सांगितले की, गडचिरोली आता माओवादमुक्त होतो आहे. अफवांपासून दूर राहून विकासात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, पद्मश्री तुलसी मुंडा, आमदार आत्राम, डॉ. नरोटे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. लॉयड्सचे बी. प्रभाकरन यांनी प्रास्ताविक केले.

========================================

गडचिरोली विकासाच्या टिळ्याने मुख्यमंत्री फडणवीसांचा वाढदिवस विशेष

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांचे शुभेच्छा संदेश; राज्यभरात आरोग्य उपक्रमांची रेलचेल

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी समर्पित करत, विकासकामांचा भव्य आराखडा आज प्रत्यक्षात उतरवला. त्यांनी गडचिरोलीत 24,000 कोटींच्या गुंतवणुकीचा 4.5 एमटीपीए स्टील प्लांट, हेडरी-कोनसरी स्लरी पाईपलाईन, आयर्न ओर युनिट, पॅलेट प्लांट, 100 खाटांचे रुग्णालय, सीबीएसई शाळा व लॉईडस टाऊनशीप अशा अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन व उदघाटन केले.

यावेळी ‘हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र’ वृक्षारोपण मोहिमेची सुरुवातही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाली. हा संपूर्ण भाग औद्योगिक, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात नवे मापदंड स्थापन करणारा ठरणार आहे.

वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री शिंदे-पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा देताना त्यांच्या विकासदृष्टिकोनाचे कौतुक केले.

राज्यभरात मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून रक्तदान, आरोग्य तपासणी, अवयव दान जनजागृती, कृत्रिम अवयव वाटप, आभा कार्ड वितरण यांसारखे उपक्रम आयोजित करण्यात आले. स्वयंसेवी संस्थांनीही निधीत योगदान दिले.

गेल्या वर्षी नवीन वर्षाचा पहिला दिवस जवानांसोबत साजरा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी यंदा वाढदिवस गडचिरोलीच्या विकासाला वाहून गेला. त्यामुळे हा वाढदिवस विकासाचा टिळा ठरला.