Home Maharashtra Nagpur | मतदारांनी सजगपणे मतदानाचा हक्क बजावावा- डॉ. संजीव कुमार

Nagpur | मतदारांनी सजगपणे मतदानाचा हक्क बजावावा- डॉ. संजीव कुमार

795
  • राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात
  • भव्य सायकल रॅलीने मतदार जागृतीचा प्रारंभ
  • जगातील सर्वात कमी उंचीच्या ज्योती आमगे यांचा गौरव

नागपूर ब्युरो : लोकशाही परंपरेचे जतन करण्यासाठी मुक्त आणि नि:ष्पक्ष वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य जपताना प्रत्येक भारतीयाने निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
राष्ट्रीय मतदार दिनाचा मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती खेमचंद आमगे, राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू जयंत दुबळे, ग्रॅण्ड मास्टर रौनक साधवानी, निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर यावेळी उपस्थित होते.

जगातील समृद्ध लोकशाही परंपरा जपताना विविध क्षेत्रात भारताने नेत्रदीपक प्रगती केली आहे. भारत निवडणूक आयोगाने ही उज्ज्वल परंपरा जपतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मतदारांच्या सुविधेसाठी केला असल्याचे सांगताना डॉ. संजीव कुमार म्हणाले की, इव्हीएम, व्हीव्हीपॅट याचा यशस्वी वापर झाल्यानंतर ऑनलाईन मतदार नोंदणीची सुविधा मतदारांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. आज इ-इपिक डाऊनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करुन एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला अधिक समृद्ध करावे, असे आवाहन यावेळी डॉ. संजीव कुमार यांनी केले.

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी प्रगल्भ लोकशाहीसाठी प्रत्येक मतदारांमध्ये मतदानाबद्दल जागृकता निर्माण करुन मतदाराने आपला हक्क बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. याबद्दल मूल्याधारित मतदार शिक्षण आवश्यक आहे. निवडणुकीत मतदान करताना कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करणे तसेच धर्म, वंश, जात, समाज व भाषा याच्या प्रभावाखाली न येता समृद्ध लोकशाहीसाठी मतदान करावे. मतदान प्रक्रियेत युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी श्री. ठाकरे यांनी केले.

मतदार नोंदणीचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असून अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवक व युवतींनी मतदार यादीत आपले नाव प्राधान्याने नोंदवावे. जिल्ह्यात मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत 52 हजार 527 मतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये 12 हजार 378 नव मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात 42 लाख 30 हजार 388 मतदार आहेत. मतदारांना फोटो ओळखपत्र देण्यात आले असून ज्या मतदारांकडे फोटो ओळखपत्र नाही. तसेच मतदार यादीत अद्याप नाव नोंदविले नाही. त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात आला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

मतदार जागृती अभियानामध्ये सहभाग घेतल्याबद्दल श्रीमती ज्योती आमगे, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू जयंत दुबळे, तसेच भारताला नावलौकिक मिळवून दिलेले ग्रॅण्ड मास्टर रौनक साधवानी यांचा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी विशेष गौरव केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आदर्श मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम केलेल्या बारा मतदान केंद्राधिकाऱ्यांचा यांचा स्मृतिचिन्हे देवून गौरव करण्यात आला.
प्रारंभी निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर यांनी प्रास्ताविक तर निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांनी स्वागत केले.

भव्य सायकल रॅली

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मतदान करणे हे राष्ट्रीय कार्य आहे. लोकशाही परंपरेचे जतन करण्यासाठी मी मतदान करणार तसेच मतदार यादीत नाव नोंदवणे हा माझा अधिकार आहे. मी भारताचा मतदार असल्याचा मला अभिमान आहे. अशा घोषवाक्यांचे फलक घेऊन प्रबोधन करण्यात आले.

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सायकल पटू सहभागी झाले होते. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदारांना कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ देण्यात आली. नव मतदारांची नोंदणी करुन त्यांना मतदार ओळखपत्र विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नव मतदार, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.