Home Maharashtra Sudhir Mungantiwar । आजचे तरुण हे भारताचे भाग्यविधाते

Sudhir Mungantiwar । आजचे तरुण हे भारताचे भाग्यविधाते

692

 लोकमान्य विद्यालय भद्रावती आयोजित व्याख्यानमाला संपन्‍न

चंद्रपूर ब्युरो : आजचे तरुण हे भारताचे भाग्यविधाते असून सुदृढ तरुणांच्या बळावर भारत हा देश  जगाचा कप्तान होऊ शकतो. आकाशात झेप घेण्याची ऊर्जा निर्माण केली पाहिजे .जिथे जाल तिथे संधी आहे फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जागतिक परिप्रेक्षात भारतासमोरील आव्हाने व संधी या विषयावर व्याख्यानमालेत ते बोलत होते.

याप्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्‍पनेचा प्रामुख्याने उल्लेख केला. कोरोना काळात अमेरिकेसारख्‍या देशाने भारताकडून औषधी आयात केल्‍या. भारताकडे आज कोरोनाच्‍या लसीसाठी जगभरातुन मागणी केली जात आहे. आज ख-या अर्थाने भारत आत्‍मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. या देशामध्‍ये मोठी शक्‍ती आहे. त्‍या शक्‍तीचा योग्‍य उपयोग करण्‍याची आवश्‍यकता आहे. आज हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वात प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे. स्‍वातंत्र्यापुर्वी या देशाला इंग्रजांनी लुटले व स्‍वातंत्र्यानंतर चुकीच्‍या नियोजनाने देश मागे गेला.

सभ्‍यता जहा जन्‍मी असे वर्णन भारत देशाचे केले जाते. हा केवळ शब्‍दांचा समुह नसुन या देशाची ही शक्‍ती आहे. लालबहादुर शास्‍त्रीजींनी जय जवान जय किसान चा नारा दिला, श्रध्‍देय अटलजींनी त्‍याला जय विज्ञान अशी जोड दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय अनुसंधान अशी जोड त्‍याला दिली. आज हा देश जगाच्‍या परिप्रेक्षात नवनविन संधी शोधत आव्‍हानांवर मात करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमात एकदा म्‍हणाले, सोन्‍याची एक संधी साधण्‍यापेक्षा प्रत्‍येक संधीचे सोने करा. पंतप्रधानांचे हेच वाक्‍य प्रत्‍येक विद्यार्थ्‍याने आचरणात आणण्‍याची गरज त्‍यांनी यावेळी बोलताना प्रतिपादित केली.

लोकसेवा मंडळ नावाची संस्था स्थापन करुन स्व. नीळकंठराव गुंडावार यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनिय असून या संस्थेतर्फे चालू असलेले कार्य हे  ख-या अर्थाने लोकसेवा आहे, असे प्रशंसोद्गार आ.सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

ते येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालन करणा-या लोकसेवा मंडळाचे आद्य संस्थापक स्व. नीळकंठराव उपाख्य बाबुराव पाटील गुंडावार यांच्या ११३ व्या जयंती समारोहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, आपल्याच देशात आदर्श आणि प्रेरणा घेण्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत. त्यामुळे इतर देशांच्या लोकांकडून प्रेरणा घेण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी व जिद्दीने अभ्यास करावा, असा सल्‍लाही  मुनगंटीवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते.तर प्रमुख वक्ते म्हणून विहिंपचे विदर्भ प्रांत महामंत्री गोविंद शेंडे, प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार महेश शितोळे, लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बळवंतराव गुंडावार, लोकसेवा मंडळाचे सचिव मनोहरराव पारधे, सहसचिव नामदेवराव कोल्हे, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सदस्य मधुकरराव नारळे, उमाकांत गुंडावार, प्राचार्य पी.आर.बतकी, पर्यवेक्षक बी.एम.दरेकर, जयंती समारोह प्रभारी प्रा. सचिन सरपटवार प्रभृती मंचावर उपस्थित होते.

सर्वप्रथम सरस्वती, स्व. नीळकंठराव गुंडावार आणि स्व. जगन्नाथ गावंडे यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे वृक्ष आणि ग्रामगीता देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी प्रमुख वक्ते गोविंद शेंडे यांचा शाल,श्रीफळ,वृक्ष आणि ग्रामगीता भेट देऊन चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सिद्धी मिलिंद गंपावार या विद्यार्थिनीने डी.फार्म.मध्ये घवघवीत यश मिळविल्याबद्दल तिच्या वडिलांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी ‘राम मंदिर ते राष्ट्र मंदिर’ या विषयावर गोविंद शेंडे यांनी गुंफलेल्या पहिल्या पुष्पातून भारताला शक्तीशाली बनविण्याचे आवाहन केले.तसेच काश्मिरमधील नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ येणे हे अयोग्य असल्याचे म्हटले.राम मंदिर विश्वाची ताकद असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी, स्व.नीळकंठराव गुंडावार यांच्या जिवनावर आधारीत गौरव गीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बतकी यांनी केले.संचालन उपप्राचार्य सुरेश परसावार यांनी केले.तर आभार पर्यवेक्षक दरेकर यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.