Home Nagpur वि. सा. संघाच्‍या अध्‍यक्षपदी प्रदीप दाते । म्हैसाळकरांच्या मृत्युमुळे रिक्त जागी निवड;...

वि. सा. संघाच्‍या अध्‍यक्षपदी प्रदीप दाते । म्हैसाळकरांच्या मृत्युमुळे रिक्त जागी निवड; 22 वे अध्यक्ष म्हणून संभाळणार कारभार

366

नागपूर ब्युरो : मनोहर म्हैसाळकर यांच्या आकस्मिक मृत्युमुळे रिक्त झालेल्या विदर्भ साहित्‍य संघाच्‍या अध्‍यक्षपदी वर्धा येथील प्रदीप दाते यांची बुधवारी झालेल्‍या कार्यकारिणीच्‍या तातडीच्‍या बैठकीत निवड करण्‍यात आली. विदर्भ साहित्‍य संघाच्‍या सांस्‍कृतिक संकुल, सीताबर्डी, नागपूर येथील कार्यालयात वि. सा. संघाच्‍या कार्यकारिणीची बैठक पार पडली.

 

मनोहर म्‍हैसाळकर यांच्या निधनानंतर वि. सा. संघाचे अध्‍यक्षपद रिक्‍त झाले होते. विदर्भ साहित्‍य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यात प्रदीप दाते यांच्‍या नावावर अध्‍यक्षपदासाठी शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले. प्रदीप दाते हे विद्यमान कार्यकारिणीत शाखा समन्‍वयक म्‍हणून कार्यरत आहेत. दाते हे वि. सा. संघाचे 22 वे अध्यक्ष आहेत. केशवराव कोरटकर हे पहिले अध्यक्ष होते. यापूर्वी लोकनायक बापूजी अणे, ग. त्र्यं. माडखोलकर, कुसुमावती देेशपांडे, प्रा. वि. भि. कोलते, राम शेवाळकर, शं. दा. पेंडसे, डाॅ. मधुकर आष्टीकर, प्रा. सुरेश द्वादशीवार आदींनी अध्यक्षपद भूषविले आहे.

प्रदीप दाते यांना संस्‍थात्‍मक कार्याचा दीर्घ अनुभव असून ते गेल्‍या सुमारे चार दशकांपासून सामाजिक, सांस्‍कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहेत. यशवंतराव दाते स्‍मृती प्रतिष्‍ठानचे ते अध्‍यक्ष असून अनेक संघटनांमध्‍ये विविध पदांवर कार्यरत आहेत. विदर्भ साहित्‍य संघाशी गेल्‍या तीन दशकांपासून ते संबंधित असून अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळात ते विदर्भ साहित्‍य संघाचे प्रतिनिधीत्‍व करीत आहेत. महाराष्‍ट्रातल्‍या अनेक सामाजिक कार्यकर्त्‍यांशी व साहित्यिकांशी त्‍यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्‍यांच्‍या नेतृत्‍वात विदर्भ साहित्‍य संघाचे कार्य समर्थपणे पुढे जाईल, असा विश्‍वास कार्यकारिणीतर्फे व्‍यक्‍त करण्‍यात आला.

विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष आणि कुशल संघटक, व्यवस्थापक, साहित्य नाटकाचे जाणकार मनोहर म्हैसाळकर यांचे शुक्रवार १४ आॅक्टोबर रोजी निधन झाले होते. त्यांच्या नंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रदीत दाते यांची निवड करण्यात आली. विदर्भ साहित्य संघ ही विदर्भातील सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. ही संस्था अण्णासाहेब खापर्डे यांनी जानेवारी १४, १९२३ रोजी अमरावती येथे स्थापन केली. त्यानंतर मार्च १९५० मध्ये तिचे मुख्य कार्यालय नागपूरला हलवण्यात आले. आजही ते नागपूर येथेच आहे. शहरातील संस्थेचे सभागृह झाशी राणी चौकात, सिताबर्डी येथे आहे. ही संस्था दरवर्षी विदर्भ साहित्य संमेलन भरवते. विदर्भ साहित्य संघाचे “युगवाणी’ या नावाचे एक साहित्य विषयाला वाहिलेले त्रैमासिक आहे.

Previous articleIIM Nagpur to train Navy personnel in biz mgmt, signs MoU with Indian Navy
Next articleMCA | शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सूचक इशारा; लक्षात ठेवा माझे सासरे शिंदे होते
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).