Home Nagpur ‘पोलिस दीदी’ नंतर आता ‘पोलिस काका’ योजना:नागपूरमध्ये अमली पदार्थांचा वापर रोखण्याकरिता करणार...

‘पोलिस दीदी’ नंतर आता ‘पोलिस काका’ योजना:नागपूरमध्ये अमली पदार्थांचा वापर रोखण्याकरिता करणार काम

नागपुरातील तरुणाईमध्ये अमली पदार्थांचा वाढता वापर लक्षात घेत पोलिसांनी ‘पोलीस काका’ ही नवी मोहीम सुरू केली आहे. ‘पोलीस दिदी’ नंतर आता ‘पोलीस काका’ गुन्हेगारांच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत.

“पोलीस काका’ योजनेतील पथकासाठी निवडलेल्या निवडक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. नावाजलेले व्यसनमुक्ती सल्लागार बॉस्को डिसुझा यांनी नागपूर शहरातील प्रत्येक पोलिस स्टेशनमधून निवडलेल्या १३५ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. भविष्यात वेळोवेळी मानसोपचार तज्ज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञही पोलिस काका पथकाला प्रशिक्षण देणार आहे. पोलिस काकांच्या प्रशिक्षणात पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त अस्वती दोर्जे हे स्वतः उपस्थित होते. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक पोलिस स्टेशनमधून चार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालय, तरुणांचे संघटन तसेच गणेशोत्सव आणि नवरात्र मंडळ यांना संपर्क साधून अमली पदार्था विरोधात जागृती करतील.

नागपूर पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी पथक सतत अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात कारवाया करते. तरीही एक आरोपी तुरुंगात जाताच दुसरा आरोपी त्याच्या जागी अमली पदार्थांच्या व्यवसायात उतरतो. कारण तरुणाईमधून अमली पदार्थांची मागणी जास्त आहे. नागपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे २०२२ च्या जानेवारी ते जुलै या सात महिन्यातच अमली पदार्थांच्या साठवण, सेवन आणि विक्रीचे ११३ प्रकरण दाखल झाले आहे. त्यामध्ये नागपूर पोलिसांनी १ कोटी १५ लाख रुपयांचे ३९५ किलो अमली पदार्थ जप्त केले आहे. त्यामध्ये गांजा, ब्राऊन शुगर, चरस, कोकेन, एमडी अशा विविध अमली पदार्थांचा समावेश आहे. या सर्व कारवायांमध्ये १७२ आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे. मात्र तरीही अमली पदार्थांची तस्करी काही केल्या थांबत नाही आहे. त्यामुळे आता तरुणाईला जागृत करत अमली पदार्थांच्या वापरावरच घाला घालण्याचे नागपूर पोलिसांनी ठरवले आहे.

काही महिन्यांपूर्वी नागपूरच्या सह पोलीस आयुक्त अस्वती दोर्जे यांच्या संकल्पनेतून “पोलीस दीदी’ ही योजना राबवण्यात आली होती. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी, तरुणी आणि महिलांच्या छेडखानीच्या घटनांना आळा बसण्यासाठी त्याचा मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. पोलीस दीदी योजनेच्या माध्यमातून नागपूर पोलिसांनी विद्यार्थिनी गूड टच, बॅड टचबद्दल माहिती दिली होती. यासह छेडखानीच्या घटना होत असताना कोणाला माहिती द्यावी. त्याला कसे सामोरे जावे याबद्दल ही माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली होती.

Previous article‘शिवसेना’ कोणाची?:’सुप्रीम’ कोर्टात सुनावणी सुरू, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात काय येणार फैसला, देशाचे लक्ष
Next articleठाकरे गटाचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र : एकनाथ शिंदे सरकार ‘विषारी झाडाचे फळ’ असल्याची टीका
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).