Home मराठी 2500 फुटांवर अडकलेल्या 3 ट्रॉलींमध्ये हेलिकॉप्टरने पोहोचले जवान, आणखी 10 जणांची सुटका

2500 फुटांवर अडकलेल्या 3 ट्रॉलींमध्ये हेलिकॉप्टरने पोहोचले जवान, आणखी 10 जणांची सुटका

झारखंडमधील देवघर येथील त्रिकुट पर्वतावर रोपवे अपघाताचा मंगळवारी तिसरा दिवस आहे. 40 तासांहून अधिक काळ लोटला आहे. अजूनही 2500 फूट उंचीवर रोपवेच्या 3 ट्रॉलींमध्ये लोक अडकलेले आहेत. हवाई दलाचे जवान हेलिकॉप्टरने ट्रॉलीपर्यंत पोहोचले असून तिसऱ्या दिवशी अडीच तासांच्या ऑपरेशनमध्ये 14 पैकी 10 जणांना बाहेर काढण्यात आले. यात दोन मुली आहेत. आता फक्त 4 लोक बचावासाठी उरले आहेत. सोमवारी सायंकाळी ट्रॉलीमध्ये एक जवान अडकला होता, त्याला सकाळी बाहेर काढण्यात आले.

सोमवारी लष्कर, हवाई दल, आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या पथकांनी 12 तासांच्या ऑपरेशननंतर तीन हेलिकॉप्टर आणि दोरीच्या मदतीने 33 जणांची सुटका केली. बचावादरम्यान सेफ्टी बेल्ट तुटल्यामुळे हेलिकॉप्टरमधून खाली पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर अंधार आणि धुक्यामुळे ऑपरेशन मागे घेण्यात आले. आतापर्यंत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एकाला प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही. तर 12 जण जखमी झाले आहेत.

हवाई दल, लष्कर आणि एनडीआरएफच्या तुकड्या अतिरिक्त दक्षता घेत आहेत. टीममध्ये समाविष्ट असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तीन ट्रॉली सर्वात वर आहेत. त्यामुळे लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात नियोजनबद्ध काम केले जात आहे. रोपवेच्या वायरीमुळे लोकांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे.

आतापर्यंत हवाई दलाचे तीन हेलिकॉप्टर या कारवाईत गुंतले आहेत. उच्चपदस्थ अधिकारी सातत्याने घटनास्थळी तळ ठोकून आहेत. गेल्या दोन दिवसांत झालेल्या या अपघातात एकूण 42 जणांना वाचवण्यात यश आले आहे. काही लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये महिला व मुलींचा समावेश आहे. काही जखमींना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

सध्या तीन ट्रॉलीमध्ये 12 ते 14 जण अडकले आहेत. ज्यामध्ये दोन ट्रॉलीमध्ये एकाच कुटुंबातील सुमारे 8 ते 10 लोक सामील आहेत, जे देवघर येथील राम मंदिर रोड परिसरातील रहिवासी आहेत. हे लोक ट्रॉली क्रमांक 6 आणि 7 मध्ये अडकले आहेत. छठीलाल साह, त्यांची पत्नी शोभा देवी, मुलगा अमित कुमार, सून खुशबू कुमारी, जया कुमारी, दोन मुले, 3 वर्षांचा वीर आणि 10 वर्षांचा कर्तव्य यांचा समावेश आहे.